जय जवान जय किसान मुलांची सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, सोलापूर.
वार्षिक अहवाल २०२५-२६
विघ्नहर्ता
श्री गणराया व विद्येची देवता श्री सरस्वतीदेवी यांना वंदन करून, शिवरायांच्या
पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीत व विवेकानंदांच्या प्रेरणादायी विचाराने प्रेरित होऊन; तसेच “शिस्त, संस्कार आणि देशभक्ती यांचा त्रिवेणी संगम
म्हणजेच जय जवान जय किसान मुलांची सैनिकी शाळा व ज्युनिअर कॉलेज, सोलापूर”.
शैक्षणिक
गुणवत्ता, क्रीडा प्रावीण्य आणि राष्ट्रसेवेसाठी सज्ज
घडणारी पिढी घडवण्याच्या ध्येयाने आम्ही
शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मध्ये विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व
सामाजिक उपक्रम यशस्वीरीत्या राबवले. या सर्व उपक्रमांचा व
कार्याचा सविस्तर अहवाल सादर करताना आम्हाला अत्यंत अभिमान व आनंद वाटत आहे.
“ग्रामीण
पार्श्वभूमीतून येणारा विद्यार्थी जेव्हा इंग्रजी माध्यमात प्रवेश घेतो, तेव्हा त्याच्यासमोर भाषा नव्हे तर
आत्मविश्वासाचे आव्हान असते; आणि अशा प्रत्येक
विद्यार्थ्याला समजून घेत, मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव व प्रेमळ सहकार्याच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमाशी
आत्मसात करून घेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आमची शाळा अत्यंत यशस्वीपणे पार पाडते.”
या करिता इयत्ता सहावी च्या विद्यार्थ्यांसाठी
इंग्रजी विषयाचे कृतियुक्त अध्यापन
करण्यात येते.
लहानपणापासून स्पर्धात्मक परीक्षेला सामोरं गेलं तर जीवनात
येणार्या कोणत्याही परीक्षेची भीती वाटत नाही. यासाठी गणित,इंग्रजी,विज्ञान,ऑलिंपियाड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना बसविण्यात आले, इयत्ता सहावी व नववीतील
विद्यार्थ्यांकरीता डॉ. होमी भाभा व विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेसाठी बसविण्यात आले. सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसविण्यात आले व
त्या-त्या विषय शिक्षकांकडून तयारीही करून घेण्यात येत आहे.
दहावी
हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील अत्यंत निर्णायक आणि दिशा ठरवणारा टप्पा आहे. या
महत्त्वाच्या टप्प्यावर शाळा कोणत्याही परिस्थितीत मागे न पडता विद्यार्थ्यांच्या
उज्ज्वल भवितव्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. दहावीचा शंभर टक्के अभ्यासक्रम
सर्व विषयांसह नियोजनबद्धरीत्या पूर्ण करण्यात आला असून, पुढील टप्प्यात अधिक आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी
जास्तीत जास्त सराव परीक्षांचे आयोजन करण्यात येत आहे.
अकरावी
व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विषयानुसार सुसज्ज प्रयोगशाळा उपलब्ध करून देऊन
गुणवत्तापूर्ण शिक्षणाची भक्कम पायाभरणी करण्यात आली आहे. तसेच बारावीच्या
विद्यार्थ्यांसाठी एनडीए,जेई, नीट, एमएचटी सीईटी यांसारख्या स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी तज्ञ
मार्गदर्शकांची प्रेरणादायी व्याख्याने व मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात आली
आहेत.
विद्यार्थ्यांचा
आत्मविश्वास अधिक दृढ व्हावा यासाठी घटकनिहाय, विभागनिहाय तसेच संपूर्ण पाठ्यपुस्तकावर आधारित सराव
परीक्षा घेऊन अभ्यासक्रमाची सखोल तयारी करून घेतली जाते. इयत्ता सहावी ते
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ई-क्लास’च्या माध्यमातून इंटरनेट व प्रोजेक्टरच्या
सहाय्याने आधुनिक, प्रभावी व
विद्यार्थीकेंद्रित अध्यापन केले जाते.
महाराष्ट्र
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड पुणे मार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त
परीक्षेचा निकाल; इयत्ता दहावी सलग चौदा वर्ष
व बारावी बारा वर्ष शंभर टक्के
निकालाची यशस्वी परंपरा आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत इयत्ता बारावीचा तेजस ढोरे ८४.८३%
घेवून प्रथम , श्रेयश बागडे ८१.५०% गुण घेवून द्वितीय, आर्यन वळसने ८०.००%
गुणांनी तृतीय क्रमांक पटकावलेला आहे.तसेच या परीक्षेमध्ये ७ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण
झालेले आहेत.
इयत्ता
दहावीतील सिद्धार्थ बोंबलट ९१.००% प्रथम, शौर्य हजारे ९०.६०% गुण घेवून द्वितीय व रेहान नदाफ ८८.६०% घेवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
महाराष्ट्र
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे आयोजित इयत्ता बारावी
सामान्य ज्ञान विषय परीक्षा नऊ वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने यशस्वीरित्या राबविण्यात आली.
विद्यार्थ्यांना
शांत, सुरक्षित व अभ्यासाला पोषक वातावरण मिळावे
आणि त्यांच्या ज्ञानसाधनेला योग्य दिशा मिळावी यासाठी शाळेत सर्व
विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज व सुव्यवस्थित २४ तास आभ्यासिकेची व्यवस्था करण्यात आली
आहे.
खेळांच्या
माध्यमातून सैनिकाला आवश्यक असलेली सहनशक्ती, संघभावना व आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतो. शाळेत
खेळ हे विद्यार्थ्यांना कणखर, शिस्तप्रिय व
राष्ट्रसेवेसाठी सज्ज बनवतात. तसेच मैदानावरील खेळच उद्याच्या रणांगणासाठी विद्यार्थ्यांना
मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम करतात.
खेलो से चरित्र का निर्माण होता है |
और चारित्र्यवान खिलाडियों से राष्ट्र का निर्माण होता
है |
खेळातूनच विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणाला वाव
मिळतो व त्यांचा सर्वांगीण
विकास होण्यास मदत होते त्यादृष्टीने सालाबादाप्रमाणे शाळेत क्रीडा सप्ताहाचे
आयोजन करण्यात आले. शालेय क्रीडा सप्ताहात विविध
खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला असून, खो-खोमध्ये महाराणा प्रताप हाऊस, व्हॉलीबॉल व सेपक टकारामध्ये छत्रपती संभाजी महाराज हाऊस तसेच फुटबॉलमध्ये
नेताजी सुभाषचंद्र बोस हाऊस यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले.
·
१९ वर्षांखालील
शालेय जिल्हास्तरीय गोळाफेक स्पर्धेत उत्कृष्ट खेळ कौशल्याचे प्रदर्शन करत प्रेम
पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावून शाळेच्या गौरवात मानाचा शिरपेच रोवला आहे.
·
१९ वर्षाखालील
शालेय जिल्हास्तरीय रिले ४×१०० स्पर्धेत प्रथमेश बंडगर, संतसंयम चव्हाण, रेहान
नदाफ, शिवम माने व श्लोक हलसंगी यांनी उत्कृष्ट संघभावना,
मेहनत आणि खेळाडूवृत्तीच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला.
·
१९
वर्षाखालील शालेय जिल्हास्तरीय रिले ४×४०० स्पर्धेत प्रथमेश बंडगर, संतसंयम चव्हाण, रेहान
नदाफ, शिवम माने व प्रथमेश गायकवाड यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
·
१९
वर्षाखालील शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेत ११० मीटर अडथळे (हर्डल्स) पार
करण्यामध्ये संतसंयम चव्हाण याने तृतीय
क्रमांक मिळवला.
·
१४
वर्षाखालील शालेय विभागस्तरीय सेपक टकारा स्पर्धेत अथर्व निकाळजे याने सहभाग
नोंदवला.
·
१४
वर्षाखालील शालेय विभागस्तरीय खो-खो स्पर्धेत अजित राठोड व वेदांत चव्हाण यांनी
सहभाग घेतला.
·
१९
वर्षाखालील शालेय विभागस्तरीय सेपक टकारा स्पर्धेत प्रणाल जाधव याचा सहभाग.
·
१९
वर्षाखालील शालेय विभागस्तरीय १०० मीटर धावणे स्पर्धेत संतसंयम चव्हाण याचा सहभाग.
·
१९
वर्षाखालील विभागस्तरीय लांब उडी स्पर्धेत प्रथमेश बंडगर याचा सहभाग.
·
१७
वर्षांखालील विभागस्तरीय हातोडा फेक स्पर्धेत ओंकार बंडगर याचा सहभाग.
·
१७
वर्षाखालील शालेय विभागस्तरावर उशू आणि किक बॉक्सिंग स्पर्धेत शिवम माने याने सहभाग
घेवून शाळेचे नाव उज्ज्वल केले.
·
१७
वर्षांखालील राज्यस्तरीय सेपक टकारा स्पर्धेत प्रेम बिरादार याने सहभाग नोंदवून
शाळेचे नाव गौरविले.
२००६ पासून ते २०१६ पर्यंत महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा
क्रीडा विभागामार्फत प्रोत्साहनपर अनुदान
प्राप्त झाले आहे. तसेच सैनिक शाळेच्या भव्य
प्रांगणात स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती, महसूल, समाजकल्याण विभाग, वैद्यकीय विभाग व विविध संघटना यांच्यावतीने वेगवेगळ्या क्रिडास्पर्धा आयोजित केल्या
जातात. या क्रिडा स्पर्धांसाठी
आमच्या शाळेमार्फत सहकार्य केले जाते व प्रमुख पाहुण्यांना आकर्षित करणारे संचलन बँड पथकासह नेहमीच तत्पर असते.
सोलापूर मॅरेथॉन मध्ये स्वयंसेवक म्हणून बँड पथकासह विद्यार्थ्यांची उपस्थिती.
विद्यार्थी
हा केवळ वर्गातच नव्हे तर घर, शाळा व समाजाच्या
संपर्कातून घडत असतो; त्यामुळे
सहशालेय उपक्रमांना शाळेत विशेष महत्त्व दिले जाते. या दृष्टीने शाळा सह-शालेय उपक्रमांचे आयोजन करते. त्याचाच भाग म्हणजे शैक्षणिक सहल. शालेय सहलीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष
अनुभवातून ज्ञान मिळावे, त्यांचा दृष्टिकोन
व्यापक व्हावा व शिकणे आनंददायी व्हावे हा असतो. पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे
जाऊन विद्यार्थ्यांना निसर्ग, इतिहास व
संस्कृतीचे सजीव ज्ञान मिळावे, म्हणून सैनिकी
शाळेतील विद्यार्थ्यांची सहल अहिल्यानगर येथील आर्मी कॅम्पला आयोजित करण्यात आली
होती. या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना आर्मी कॅम्पमधील संग्रहालय दाखविण्यात आले, ज्यातून त्यांना भारतीय सैन्याचा गौरवशाली
इतिहास व शौर्यपरंपरेची माहिती मिळाली. ले.कर्नल शक्ती सिंग यांनी विद्यार्थ्यांना
मौल्यवान मार्गदर्शन करत एनडीए व आयएमए याविषयी माहिती देत सैनिकी जीवनातील शिस्त, कर्तव्यभावना व राष्ट्रसेवेचे महत्त्व
समजावून सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी फायर रेंजची पाहणी करून रायफल
हाताळणीबाबत प्रत्यक्ष माहिती घेतली. काही विद्यार्थ्यांनी रोप क्लाइंबिंगचा अनुभव
घेत धैर्य व आत्मविश्वासाचे दर्शन घडविले. प्रत्यक्ष रणगाड्यांच्या जवळ जाऊन
त्यांच्या भागांची पाहणी करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. यावेळी रणगाडा
चालवण्याचे प्रशिक्षण आणि युद्धभूमीवरील त्याचे महत्त्व यावर लष्करी जवानांनी
प्रकाश टाकला. आर्मी कॅम्पमधील शिस्तप्रिय वातावरण, काटेकोर
प्रशिक्षण आणि अनुशासन पाहून सर्व विद्यार्थी अत्यंत भारावून गेले.
त्यानंतर
छत्रपती संभाजीनगर येथील घृष्णेश्वर मंदिर ,वेरूळ लेणी, बीबी का मकबरा, दौलताबाद
किल्ला, व भद्रा मारुती आदी निसर्गमय व ऐतिहासिक स्थळांची
माहिती मिळावी, या उद्देशाने शैक्षणिक सहलीचे सुयोग्य नियोजन
करण्यात आले होते.
एनडीए
परीक्षेचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना लवकर मिळावा आणि त्यातून त्यांचा सहभाग
व तयारी अधिक दृढ व्हावी, या हेतूने
इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना दोन वेळा परीक्षेला बसविण्यात आले. त्यामुळे त्यांना
भविष्यातील यूपीएससी परीक्षांसाठी आवश्यक असलेला आत्मविश्वास व अनुभव मिळावा, या उद्देशाने शाळेने हा उपक्रम यशस्वीपणे राबविला.
इयत्ता बारावीची एनडीए परीक्षा धारवाड येथे संपन्न झाली. त्यात
सर्व मुलांचा सहभाग
होता. त्यानंतर
धारवाड, हुबळी
येथील हुंकलकेरी तलाव व बगीचा, श्री सिद्धारूढ मठ व जगातील सर्वात मोठे रेल्वे
प्लॅटफॉर्मला भेट देऊन शैक्षणिक व सांस्कृतिक अनुभव समृद्ध केला.
तसेच इयत्ता
सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय शैक्षणिक सहलीचे कर्नाटकातील कुडलसंगम
या ऐतिहासिक ठिकाणी आयोजन केले होते.
स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांमध्ये
पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञान असणे आवश्यक आहे. यासाठी बँकेमध्ये स्वतः खाते खोलणे, रेल्वे
रिझर्वेशन करणे व पोस्ट ऑफिसला भेट देऊन तेथील
सर्व पाहणी करून कार्यप्रणाली प्रत्यक्ष अनुभवातून समजावून घेतली गेली. यामुळे
विद्यार्थ्यांना पोस्ट ऑफिसच्या सेवा, व्यवस्थापन आणि कामकाजाची माहिती प्रत्यक्ष अनुभवातून मिळाली, आणि त्यांच्या शैक्षणिक व व्यवहारिक ज्ञानात भर पडली. सोशल प्लॅटफॉर्मवर सजग राहणे विषयी जनजागृती
विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी सायबर क्राईम चे व्याख्यान आपत्कालीन
परिस्थिती कशी हाताळावी यासाठी अग्निशमन प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले.
‘आरोग्य हीच संपत्ती’
या उक्तीप्रमाणे आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे असते. त्यानुसार जिल्हा आरोग्य
केंद्रामार्फत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व लसीकरण करण्यात आले. तसेच
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी डॉ. स्वामी हे पूर्णवेळ
विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतात.
महात्मा
गांधी जयंतीच्या पावन संधीचा लाभ घेऊन शाळेत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
विद्यार्थ्यांनी वर्गखोल्या, प्रांगण
आणि सभागृह स्वच्छ करण्यास उत्साहाने सहभाग घेतला. स्वच्छतेच्या प्रत्येक पावलावर
गांधीजींच्या संदेशाची आठवण झाली – ‘स्वच्छता ही सेवाभावनेची खरी सुरूवात.’ या
उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये स्वत:च्या परिसराची काळजी घेण्याची शिकवण आणि
स्वच्छतेबाबतची जागरूकता दृढ झाली.”
लोकमान्य
टिळकांना अपेक्षित असलेला गणेशोत्सवा प्रतीची खरी खुरी अपेक्षा पूर्ततेचा प्रयास
आमच्याकडून केला जातो. त्यानुरूप गणेशोत्सव साजरा करत असताना समाजातील प्रतिष्ठित
व्यक्ती, उद्योजक, पोलीस दल, संरक्षण क्षेत्रातील
महान व्यक्तींच्या व्याख्याना बरोबर स्मरणशक्तीला चालना देणारे चॅलेंजिंग टास्क, हस्ताक्षर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वन मिनिट शो, संगीत खुर्ची व बुद्धिबळ स्पर्धा
यासारख्या अनेक स्पर्धांचे आयोजन केले व विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले. त्याबरोबर सांस्कृतिक
वारसा जपण्याच्या हेतूने पारंपारिक वाद्यांच्या मदतीने श्रींची मिरवणूक लेझीम पथकासह साजरी केली.
तसेच
राष्ट्रीय सण स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय योग दिन, शहीद दिन, ध्वज दिन, विजय दिवस, आर्मी डे, नेव्ही डे, एअर फोर्स डे साजरे करण्यात आले. निरोगी आयुष्यासाठी हात
धुवा दिन ही प्रात्यक्षिकासह साजरा केला. तसेच मराठी राजभाषा दिवस, हिंदी दिन, विज्ञान दिवस साजरे केले जातात. जागतिक
एड्सदिना निमित्त जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामार्फत
राबविण्यात आलेल्या एड्स रॅलीमध्ये बँड पथकासह विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
आमच्या
शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा या उद्देशाने
विज्ञान प्रदर्शनात स्मार्ट सिटी संकल्पने साठी आरडीएन पार्किंग सिस्टीम, स्मार्ट कार, ह्यूमन फॉलोविंग
कार, अंध व्यक्तींसाठी स्मार्ट सनग्लासेस, स्मार्ट हेल्मेट व ऑल कॉल डिटेक्टर असे विविध विज्ञानाधारित उपक्रम इयत्ता
अकरावीतील विद्यार्थी रहीम शेख यांनी यशस्वीरीत्या साकारले असून या सर्व
उपक्रमांसाठी शाळेचे प्राचार्य यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे.
प्रजासत्ताक
दिनानिमित्त सोलापूर पोलीस मुख्यालयात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संचलन केल्याबद्दल
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री
जयकुमार गोरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
महापुरुषांविषयी
आदर निर्माण व्हावा याकरिता प्रशालेमध्ये महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या,
गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा, शिक्षक दिन साजरे करण्यात
आले. वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास
साधण्याच्या हेतूने उपक्रमशील प्रयोग म्हणून सर्व कार्यक्रमांचे नियोजन व
व्यवस्थापन आमच्या विद्यार्थ्यांकडूनच करून घेतले जाते. इयत्ता आठवीच्या
विद्यार्थ्यांनी विजयादशमी निमित्त उत्कृष्ट रित्या वर्ग सजावट करून शैक्षणिक
साहित्याची पूजा केली. प्रशालेमध्ये दर शनिवारी
वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले गेले यामध्ये प्रश्नमंजुषा, चर्चासत्र, कथालेखन, कथाकथन, वकृत्व व वाद-विवाद
स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आमचा विद्यार्थी हा सुसंस्कारित व संस्कारक्षम
असावा यासाठी प्रशालेमध्ये संस्कार मोती व्याख्यानाचे आयोजन स्वतः आमचे शिक्षक करतात.
लेफ्टनंट
कर्नल सुमित मार्तंडे यांनी विद्यार्थ्यांना एनडीए परीक्षेबाबत सविस्तर व
प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी एनडीए परीक्षेचे महत्त्व, पात्रता, लेखी परीक्षा
व मुलाखत (SSB) यांची सविस्तर माहिती
दिली. तसेच नियमित अभ्यास, शिस्तबद्ध
दिनचर्या,
शारीरिक तंदुरुस्ती, आत्मविश्वास आणि देशसेवेची भावना या बाबींचे महत्त्व
विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्यांच्या अनुभवातून दिलेले मार्गदर्शन
विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी ठरले.
शाळेचे
प्रशस्त प्रांगण संपूर्णपणे अद्ययावत सीसीटीव्ही प्रणालीने सुसज्ज असून, वायफाय तंत्रज्ञानाच्या मदतीने त्याचे नियंत्रण
प्राचार्यांच्या कक्षातून तसेच मोबाईलवर थेट प्रक्षेपणाद्वारे केले जाते. शालेय
परिसरात उच्चगती इंटरनेट सुविधा उपलब्ध असून, त्याच्या साहाय्याने ई-क्लास, डिजिटल वही व विविध शैक्षणिक संदर्भांचा वापर करून अध्यापन
आधुनिक व प्रभावी पद्धतीने राबविले जाते.
विद्यार्थी
केंद्रीत शिक्षणपद्धतीमध्ये विद्यार्थी जेवढा
महत्त्वपूर्ण आहे तेवढाच शिक्षकही. अध्ययन अध्यापन कार्याबरोबर आदर्श व परिपूर्ण विद्यार्थी
बनविणे हे शिक्षकांचे महत्त्वपूर्ण कार्य आहे. त्यानुसार आमच्या
प्रशालेतील शिक्षक सदैव कार्यरत असतात. त्याबरोबर अतिरिक्त शिक्षणावरही
त्यांचा भर असतो. त्यानुरूप अनेक शिक्षकांनी सेवांतर्गत उच्च शिक्षण व
व्यावसायिक शिक्षण पूर्ण केले आहे.
आमच्या
शाळेचे प्राचार्य माननीय रविंद्र चव्हाण सर हे केवळ प्रशासक नसून ते शाळा
कुटुंबाचे प्रेरणास्थान आहेत. दूरदृष्टी, संयम आणि सकारात्मक विचारांच्या बळावर ते प्रत्येक आव्हानाला समर्थपणे
सामोरे जात शाळेचा प्रवास योग्य दिशेने नेत असतात. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळा ही
केवळ ज्ञानाचे केंद्र न राहता मूल्यसंस्कारांची आणि मानवतेची शाळा बनली आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या सामाजिक, आर्थिक व भावनिक गरजांची जाणीव ठेवून ते वेळोवेळी मार्गदर्शन व प्रोत्साहन
देतात. विशेषतः समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थी आणि गुणवान खेळाडूंना सहकार्य
करत त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचे कार्य ते निस्वार्थ भावनेने करीत असतात.
त्यांच्या नेतृत्वामुळेच आमची शाळा यश, शिस्त आणि
संस्कारांच्या मार्गावर अखंडपणे पुढे जात आहे.
सैनिकी
शाळेचा मूळ उद्देश देशरक्षणासाठी आदर्श, शिस्तप्रिय व कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्त्व घडविणे हा आहे. या
उदात्त ध्येयाला अनुसरून आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत उज्ज्वल
यश संपादन केले आहे. अनेक माजी विद्यार्थी इंडियन आर्मी, इंडियन एअर फोर्स व इंडियन नेव्हीमध्ये दाखल होऊन देशसेवेचे
व्रत निभावत आहेत. यासोबतच काही विद्यार्थी डॉक्टर, अभियंते, बँकिंग, कृषी, मरीन
इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी, मेडिकल व संरक्षण संशोधन संस्थांमध्ये कार्यरत असून, डीआरडीओमध्ये रॉकेट सायंटिस्ट म्हणून देशाच्या वैज्ञानिक
प्रगतीस हातभार लावत आहेत. अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले आमचे विद्यार्थी
हे सैनिकी शाळेच्या ध्येयधोरणांचे जिवंत प्रतीक असून, राष्ट्रनिर्मितीत मोलाची भूमिका बजावत आहेत.
पुन्हा
एकदा शाळेत जाऊया...... या भावनेने आमचे विद्यार्थी नेहमीच शाळेकडे ओढले जातात.
शाळेच्या आठवणींमध्ये मनसोक्त रमण्यासाठी ते पुन्हा पुन्हा येथे परत येतात. ही
शाळा केवळ शिक्षणाचे केंद्र नसून त्यांचे दुसरे घर असल्याची भावना त्यांच्या
प्रत्येक भेटीतून दिसून येते. शिक्षकांना आपुलकीने भेटणे, जुन्या आठवणींना उजाळा देणे आणि हक्काने
शाळेच्या दारात पाऊल ठेवणे हेच या नात्याचे खरे सौंदर्य आहे. काळ बदलतो, वाटा वेगळ्या होतात; पण शाळेशी असलेली ही नाळ मात्र
कधीच तुटत नाही.
मागास
समाजसेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय, आदरणीय, दलितमित्र चंद्राम चव्हाण
गुरुजी यांनी आपल्या दूरदृष्टीने मंडळाची स्थापना करून समाजसेवेत अमूल्य ठसा
उमठविला. त्यांच्या शुभ आशीर्वादाने व प्रेरणादायी मार्गदर्शनाने या संस्थेचे
कार्य अविरत चालू असून, त्याचाच सुफळ
परिणाम म्हणजे जय जवान जय किसान मुलांची सैनिकी शाळा व ज्युनिअर कॉलेज, जी समाजसेवेच्या कल्पवृक्षातील सुवर्ण फांदी म्हणून प्रगल्भतेने फुलत आहे.
जय
जवान जय किसान मुलांची सैनिकी शाळा व ज्यूनिअर कॉलेज ही जिल्ह्यातील एक अग्रगण्य
आणि एकमेव वैशिष्ट्यपूर्ण शिक्षण संस्था म्हणून नावारूपास आली आहे. शाळेच्या
सर्वांगीण विकासासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. सुभाष चव्हाण, उपाध्यक्ष मा. श्री. विवेक चव्हाण आणि सचिव
मा. श्री. किरण चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. त्यांच्या
दूरदृष्टीमुळेच शाळेला एक शिस्तबद्ध व प्रगत स्वरूप प्राप्त झाले आहे.
शाळेचे
प्राचार्य मा. श्री.रविंद्र चव्हाण आणि कमांडंट श्री. अशोक कुमार मनचंदा यांच्या
कुशल नेतृत्वाखाली संस्थेचे सर्व पदाधिकारी अहोरात्र कार्यरत असतात. या यशात
शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका, प्रशिक्षण
निदेशक, संगणक निदेशक, ग्रंथपाल,
प्रयोगशाळा सहाय्यक,
वसतिगृह अधीक्षक, आणि सर्व शिक्षकेतर
कर्मचारी, भोजनकक्ष सहाय्यक व सुरक्षारक्षक यांच्या परिश्रमाचा सिंहाचा वाटा
आहे. या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे आणि समर्पणामुळेच शाळेने शैक्षणिक व
क्रीडा क्षेत्रात दैदीप्यमान यश संपादन केले आहे. शिस्त, देशप्रेम
आणि गुणवत्ता यांचा संगम असलेली ही शाळा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी एक
प्रेरणास्थान ठरत आहे.
धन्यवाद
संकलन : सौ. नेवसे वनिता
शब्दांकन: श्री. ढगे एस. एम.


