वार्षिक अहवाल २०१७-१८


जय जवान जय किसान मुलांची सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर.
वार्षिक अहवाल २०१७-१८


विघ्नहर्ता श्री गणराया व विद्येची देवता श्री सरस्वतीदेवी यांना वंदन करून, शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीत व विवेकानंदांच्या प्रेरणादायी विचाराने प्रेरित होऊन, जय जवान जय किसान मुलांची सैनिकी शाळा व ज्यूनिअर कॉलेज चे कार्य अविरत चालू असते. त्यानुरूप शैक्षणिक वर्ष 2017 2018 च्या अहवालाचा आढावा घेऊयात.


आपल्या शाळेत येणारा विद्यार्थी हा ग्रामीण भागातील तसेच मराठी माध्यमाचा असल्यामुळे इंग्रजी भाषेचे आकलन होण्यास वेळ लागतो. यासाठी इयत्ता पाचवी व सहावी च्या विद्यार्थ्यांसाठी आमच्या शाळेचे प्राचार्य माननीय श्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी विषयाचे वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून अध्यापन करण्यात आले.


लहानपणापासून स्पर्धात्मक परीक्षेला सामोरं गेलं तर जीवनात येणार्‍या कोणत्याही परीक्षेची भीती वाटत नाही. यासाठी इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसविण्यात आले व त्या-त्या विषय शिक्षकांकडून तयारीही करून घेण्यात येत आहे. इयत्ता सहावी व नववी च्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रज्ञा शोध परीक्षा तर सातवी आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एलिमेंटरी परीक्षा घेण्यात आली व विद्यार्थ्यांनी घवघवीत यशही संपादन केले. इयत्ता पाचवी ते दहावी करिता महाराष्ट्र शिक्षण मंडळ मुंबई येथून प्रश्नपत्रिका मागविण्यात येतात व त्या धर्तीवर परीक्षांचे आयोजन केले जाते.


दहावी म्हटलं की जीवनाचा महत्त्वाचा टप्पा, या टप्प्यामध्ये शाळा मागे कशी राहील. इयत्ता दहावीचा १००% अभ्यासक्रम सरावासह पूर्ण झालेला आहे. यापुढे जास्तीत जास्त सराव परीक्षा घेण्यात येणार आहेत. इयत्ता अकरावी बारावी साठी विषयानुसार सुसज्ज अशा प्रयोगशाळा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी JEE,NDA, NEET CET अशा स्पर्धात्मक परीक्षांचे नियोजन करून या विषयाला अनुसरून तज्ञ मार्गदर्शकांचे व्याख्यान आयोजित केले गेले. प्रत्येक घटक निहाय विभागनिहाय व पूर्ण पाठ्यांश आधारित सराव परीक्षा अशी पूर्णपणे विद्यार्थ्यांची अभ्यासक्रमाची तयारी करून घेण्यात येते. इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी इ-क्लास च्या माध्यमातून इंटरनेट व प्रोजेक्ट च्या मदतीने अध्यापन केले जाते.


पुणे बोर्डा मार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल इयत्ता दहावी सलग सहा वर्ष व बारावी चार वर्ष शंभर टक्क्यांची यशस्वी परंपरा आहे. मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत इयत्ता बारावीचा राकेश मल्लिनाथ पवार प्रथम , सोमनाथ रमेश नागटिळक, देवेश दिलीप सिंग अनुक्रमे द्वितीय तर ओंकार भोई यांनी तृतीय क्रमांक पटकावलेला आहे.


इयत्ता दहावीतील सोहम भोसले प्रथम, आदित्य काकडे द्वितीय व विपुल गोसावी यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विशाल सलगर याने द्वितीय क्रमांक तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे आयोजित इयत्ता बारावी सामान्य ज्ञान विषय परीक्षा गतवर्षापासून ऑनलाईन पद्धतीने यशस्वीरित्या राबविण्यात आली. तसेच शिक्षण संचालक कार्यालय मार्फत सैनिकी शाळेची विशेष तपासणीयशस्वी रित्या करण्यात आली.


अभ्यास एके अभ्यास म्हटलं की मुलांना कंटाळा येतो त्याच्या जोडीला खेळही हवेतच. खेळातूनच विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणाला वाव मिळतो व त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते त्यादृष्टीने सालाबादाप्रमाणे शाळेत क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. असोसिएशन मार्फत घेण्यात आलेल्या चौदा वर्षाखालील जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय स्पर्धेत खो-खो संघ प्रथम. राज्य स्तरीय हॉलीबॉल संघ विजयी. धुळे ते पार पडलेल्या राज्यस्तरीय टेनिस व्हॉलिबॉल स्पर्धेत देसु राठोड, ओम देवतराज, समर्थ गरड यांचा सहभाग. शालेय जिल्हा स्तरीय व्हॉलीबॉल संघ उपविजेता. राज्य स्तरीय ऊशु स्पर्धेत प्रशांत गायकवाड, ओम पवार यांना सुवर्णपदक.


सतरा वर्षाखालील शालेय जिल्हास्तरीय ४*१०० रिलेमध्ये अभिजीत फटे, अदिनाथ भुसनर, सुरज सुरवसे, संकेत मेटकरी, विपुल गोसावी यांना सुवर्णपदक. शालेय जिल्हास्तरीय दोनशे मीटर धावणे स्पर्धेत सुरज सुरवसे, अभिजीत फटे यांचा अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक. सोलापूर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय ऊशु स्पर्धेत सोहम भोसले, वैभव नागटिळक, इंद्रजीत केवळे, सुरज पवार, महेश लेंगरे, गणेश लेंगरे यांना सुवर्णपदक. रोहित जाधव, निखील गोरे, आरिफ तांबोळी यांना रौप्य पदक. अभिषेक काळे, अक्षय पवार, यांना कांस्य पदक. अहमदनगर येथे पार पडलेल्या विभागीय शालेय ऊशु स्पर्धेमध्ये रौप्य, कांस्य पदकांचा समावेश. तसेच शालेय बॉक्सिंग स्पर्धेत वैभव नागटीळक, चेतन बेलदर यांना सुवर्णपदक. चिपळूण येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी विकास राठोड याची निवड.


२००६ पासून ते २०१३ पर्यंत सलग महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा क्रीडा विभागामार्फत प्रोत्साहनपर अनुदान. तसेच सैनिक शाळेच्या भव्य प्रांगणात स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती व विविध संघटना यांच्यावतीने वेगवेगळ्या क्रिडास्पर्धा आयोजित केल्या जातात. या क्रिडा स्पर्धांसाठी आमच्या शाळेमार्फत सहकार्य केले जाते व प्रमुख पाहुण्यांना आकर्षित करणारे संचलन बँड पथकासह नेहमीच तत्पर असते.


विद्यार्थी हा घडत असतो तो म्हणजे घर, शाळा आणि समाजामध्ये. या दृष्टीने शाळा सह-शालेय उपक्रमांचे आयोजन करते. विद्यार्थ्यांना निसर्गसौंदर्याचा व पर्यटनस्थळांचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या शाळेची इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी एकदिवशीय सहलीचे कुंथलगिरी, कपिलधार व येरमाळा येथे आयोजन. तसेच इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अहमदनगर येथील मिलिटरी कॅम्प, पुणे, लोहगड ट्रेकिंग इत्त्यादी प्रेक्षणीय स्थळांना भेट. इयत्ता बारावीची NDA परीक्षा धारवाड येथे संपन्न झाली. त्यात सर्व मुलांचा सहभाग त्यानंतर धारवाड, गोकाक, गोडचिम्मलकी, सौंदत्ती, सोगल सोमनाथ इत्त्यादी प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यात आली.


सैनिकी शाळेचा उद्देश NDA साठी मुले तयार करणे हा आहे. त्यादृष्टीने मुलांमध्ये प्रेरणा निर्माण करण्यासाठी NDAची एकतिसावी पासिंग-आऊट परेड खडकवासला पुणे च्या अविस्मरणीय क्षणाचा भाग आमचे विद्यार्थी बनले व त्यातूनच भविष्यामध्ये देशसेवा करण्याची विद्यार्थ्यांना प्रेरणाही मिळाली. तसेच SRP कॅम्प सोलापूर येथील शत्र प्रदर्शनामध्ये विद्यार्थींची सदिच्छा भेट. सैन्य भरती कार्यामध्ये शिक्षकांचे अनमोल सहकार्य.


संगणकाच्या युगामध्ये विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञान असणे आवश्यक आहे. यासाठी बँकेमध्ये स्वतः खाते खोलणे, रेल्वे रिझर्वेशन करणे इत्यादी विशेष उपक्रम राबविण्यात आले.


महात्मा गांधींजीनी शिक्षणाची व्याख्या करत असताना केवळ पुस्तकी ज्ञान म्हणजे शिक्षण नव्हे, तर त्यांचा सर्वांगीण विकास होणे अपेक्षित आहे. आणि त्या दृष्टीने विद्यार्थांचा भावनिक, शारीरिक, मानसिक, सामाजिक व मूल्याधिष्ठित शैक्षणिक विकास साधण्यासाठी सह-शालेय उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्याअंतर्गत व्यसनमुक्ती, लैंगिक शिक्षण, सायबर क्राईम, मानसिक ताण-तणाव, संलग्नित विद्यार्थ्यांच्या समस्या, मधुमेह निवारण मार्गदर्शन, क्षयरोग निवारण मार्गदर्शन करण्यात आले. हेंल्थ इज वेल्थ या उक्ती प्रमाणेच विद्यार्यांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे असते त्यानुसार जिल्हा आरोग्य केंद्र मार्फत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. व विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी डॉ. स्वामी हे पूर्णवेळ विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतात.


स्वच्छ भारत अभियानांतर्गत महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून प्रशालेत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शालेय परीसरात सोबत कमला नगर, नेहरूनगर परिसरातील स्वच्छता करण्यात आली.


ऑक्सिजन पार्क ची संकल्पना डोळ्यासमोर ठेवून इतर वृक्षांबरोबर तुळशीच्या रोपांचे रोपण प्रयोगशाळा परिसरात करण्यात आले.


लोकमान्य टिळकांना अपेक्षित असलेला गणेशोत्सवा प्रतिची खरीखुरी अपेक्षा पूर्ततेचा प्रयत्न करण्याचा प्रयास आमच्याकडून केला जातो. त्यानुरूप गणेशोत्सव साजरा करत असताना विविध स्पर्धाबरोबर समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांची व्याख्याने आयोजित करून विद्यार्थ्यांची प्रेरणा जागृत करण्याचे कार्य प्रशालेच्या वतीने केले जाते व त्याबरोबर सांस्कृतिक वारसा जपण्याच्या हेतूने पारंपारिक वाद्यांच्या मदतीने श्रींची मिरवणूक लेझीम पथकासह साजरी केली. तसेच राष्ट्रीय सण स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय योग दिन, रस्ता सुरक्षा दिन, जागतिक एड्सदिनानिमित्त जिल्हा शल्यचिकित्सका मार्फत राबविण्यात आलेल्या एड्स रॅलीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग.


प्रजासत्ताकदिनानिमित्त सोलापूर पोलीस मुख्यालयात उत्कृष्ट संचलनासाठी २८ ग्रुप मधून गतवर्षी स्तरनिहाय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पालक मंत्री माननीय श्री. विजय देशमुख यांच्या हस्ते प्रदान केले व यासाठी आमच्या शाळेचे प्रशिक्षण निदेशक श्री. काशिद सर व श्री. मालखरे सर हे नेहमीच सहशालेय व शालाबाह्य कार्यक्रमामध्ये सक्रीय असतात.


महापुरुषांविषयी आदर निर्माण व्हावा याकरिता प्रशालेमध्ये महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या जातात. वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या हेतूने उपक्रमशील प्रयोग म्हणून सर्व कार्यक्रमांचे नियोजन व व्यवस्थापन आमच्या विद्यार्थ्यांकडूनच करून घेतले जाते.


प्रशालेचे प्रशस्त प्रांगण पूर्णपणे CCTV अद्यावत करून त्याचे नियंत्रण वायफाय तंत्रज्ञानाच्या मदतीने प्राचार्यांच्या कक्षामध्ये व मोबाइलवर थेट प्रक्षेपण. शालेय परिसरामध्ये दोन हायस्पीड broadband इंटरनेट उपलब्ध आहेत. त्याच्या मदतीने इ-क्लास व इ-संदर्भ वापरून अध्यापन केले जाते.


विद्यार्थीकेंद्रीत शिक्षणपद्धतीमध्ये विद्यार्थी जेवढा महत्त्वपूर्ण आहे तेवढाच शिक्षकही. अध्ययन-अध्यापन कार्याबरोबर कृतिशील शिक्षक खऱ्या अर्थाने या शैक्षणिक कार्याला एक नवी दिशा देऊ शकतो, म्हणूनच आम्ही अशा कृतिशील शिक्षकांना प्रेरित करण्यासाठी कृतिशील शिक्षक पुरस्कार देतो. तशेच विज्ञानाचे जेष्ठ शिक्षक श्री. नरेंद्र राठोड यांना तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे व गणितीय क्लुप्त्या या विभागामध्ये श्री नामदेव चव्हाण यांनी तृतीय क्रमांक मिळवलेला आहे.


आपल्या शाळेचे प्राचार्य माननीय श्री. रविंद्र चव्हाण सर आपल्या ‘रवी’ या नावाप्रमाणे प्रखरतेने व तेजाने नव वर्गरुपी ग्रहांची माला यशस्वीरीत्या सांभाळून कार्यक्षमपणे येणाऱ्या अडचणींवर मात करत आमच्यासाठी नेतृत्व व मार्गदर्शन करत असतात. यातूनच आमचा शाळारूपी रथ अविरत यशस्वीपणे घौडदौड करतो आहे.


विद्यार्थ्यांना येणाऱ्या शैक्षणिकच नव्हे तर सामाजिक, आर्थिक व प्रोत्साहनात्मक मदत वेळोवेळी करत असतात आणि त्यांचे सामाजिक भान ठेऊन समाजातील गरीब, होतकरू विद्यार्थी व खेळाडूंना नेहमीच सहकार्य करत असतात.


सैनिकी शाळेचा मूळ उद्देश देश संरक्षणासाठी आदर्श व शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व तयार करणे होय. या उद्देशाला अनुसरून आमचे चार विद्यार्थी याहीवर्षी इंडियन आर्मी व २ इंडियन एअर फोर्स मध्ये दाखल झाले आहेत. तसेच बँकिंग, कृषी, मरीन इंजिनियरिंग, बायोटेक्नोलॉजी, मेडीकल इत्त्यादी क्षेत्रात कार्यरत आहेत.




शाळेचा विकास व्हावा यासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. चंद्राम गुरुजी, उपाध्यक्ष माननीय श्री लालसिंग रजपूत सर, सचिव मा. श्री. सुभाष काका चव्हाण, सहसचिव माननीय श्री. मोहन काका चव्हाण, शाळेचे प्राचार्य मा. श्री. रविंद्र चव्हाण सर, संस्थेचे सर्व पदाधिकारी निरंतर प्रयत्न करत असतात. तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका, प्रशिक्षण निदेशक, संगणक निदेशक, प्रयोगशाळा सहाय्यक व शिक्षकेतर कर्मचारी सदैव परिश्रम घेत असतात, त्यामुळेच शाळेने दैदीप्यमान यश संपादन केले आहे. अशी ही जिल्ह्यातील एकमेव जय जवान जय किसान मुलांची सैनिकी शाळा व ज्यूनिअर कॉलेज होय.


धन्यवाद