महाराष्ट्र ही संतांची भूमी, शिवबांची जन्मभूमी, गौरवशाली इतिहासाची परंपरा, आजच्या आधुनिक युगातही पुढे नेण्यासाठी भारतीय संरक्षण दलात एनडीए च्या माध्यमातून भारतातील ग्रामीण, हुशार, होतकरू तरुणांना संधी मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यात एक सैनिकी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. या शासन निर्णयानुसार सोलापूर जिल्ह्याकरिता एकमेव अशी सैनिकी शाळा मागास समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष ‘दलितमित्र’ श्री चंद्राम चव्हाण गुरुजींनी नेहरू नगरच्या शिक्षण संकुलात जय जवान जय किसान मुलांची सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाची मुहूर्तमेढ 10 जून 2004 रोजी रोवली. सुरुवातीपासूनच तळागाळातल्यांचा उद्धार व यशाची परंपरा सोबत घेऊनच शाळेने आपले मार्गक्रमण सुरू ठेवले.
इंग्रजीचे वाढते महत्त्व जाणून गुरुजींनी इतर सैनिक शाळा ह्या मराठी व सेमी माध्यमाच्या असतानाही ही शाळा इंग्रजी माध्यमात सुरू ठीक करून दूरदृष्टी व भविष्याची पुरेपूर जाण असल्याची प्रचिती दिली.
जय जवान जय किसान मुलांची सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय हे सध्या विजापूर रोड येथील नेहरू नगर परिसरात श्री. शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात सुरू आहे. संस्थेने स्वतंत्र तीस एकर जागा शाळेसाठी दिलेली असून विजापूर रोड वरील राजस्व नगर ते प्रताप नगर रोड दरम्यान डाव्या बाजूस ही जागा आहे. तेथे हे शैक्षणिक संकुल, विद्यार्थी निवास, भोजनालय, प्रशासनिक विभाग, मैदाने व इतर सोयी सुविधांच्या विकसनाचे काम चालू आहे. या सर्व गोष्टीवर स्वतः गुरुजी व संस्थेचे सचिव श्री सुभाष चव्हाण यांची करडी देखरेख असते.
नेहरूनगर परिसर हा सोलापूर बस स्टँड पासून साधारण सहा किलोमीटर व सोलापूर रेल्वे स्थानकापासून साधारण चार किलोमीटर अंतरावर असून अगदी रोड लगतच श्री. शिवाजी अध्यापक विद्यालय संकुलाच्या प्रांगणात ही शाळा चालू आहे.